आपले स्वागत आहे...

महाराष्ट्र या निसर्गाने समृध्द असलेल्या राज्यातील कोल्हापुर या जिल्यामध्ये जाखले हे गाव आहे. या ठिकाणी अनेक प्रदुषण मुक्त, निसर्गचा ठेवा असलेली स्थळे असुन सुध्दा योग्य प्रसिध्दी अभावी ती विकसीत झालेली नाहीत. या वेबसाईट ची निर्मिती करण्याचे नेमके कारण म्हणजे गावातील माहिती सर्व लोकांपर्यत पोहचावी तसेच गावाचा विकास व्हावा हाच आहे.

दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या पायथ्याशी उत्तरेला व वारणेच्या दक्षिणेला जोतिबाच्या डोंगर कुशित वसलेले एक छोटसं गांव म्हणजेच जाखले. गावचे ग्रामदैवत श्री गोपालेश्वर (महादेव मंदिर) छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळगडाच्या पूर्वेस ९-१० किलोमीटर या गावामध्ये श्री गोपालेश्वर देवाचे हेमाडपंथी मंदिर असून त्यातील पिंड स्वयंभू आहे. मंदिराचे बांधकाम हे जोतिबा मंदिरासारखे व कलाकुसर एकमेकांशी मिळती जुळती आहे.

गावाचा इतिहास

गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेतीबरोबर गुरेढोरे पाळणे हा होता. नेहमी प्रमाणे मुले जनावरे चारत बसली होती. असेच एकेदिवशी मुलांनी जे दृश्य पाहिले त्याच्यावर त्यांचा विश्वास बसेना. वांझ गाय वाघाटीच्या जाळीखाली जाऊन आता असणार्‍या श्रींच्या पिंडीवर दुधाच्या धारा सोडीत असे. गवळ्य़ाच्या मुलांना चमत्कार वाटला म्हणून त्यांनी गाईस मारले. गाय पळत असता श्रींच्या पिंडीवर गाईचा पाय पडला. गाईच्या खुराची खूण आजही पिंडीच्या माथ्यावर आपल्याला पहावयास मिळते. मुलांनी घडलेला प्रकार आपआपल्या घरी सांगितला. वडीलधार्‍या लोकांनी त्यांना खुळ्यात काढले व हसू लागले.

काही दिवसांनी उत्सुकतेपोटी थोडे लोक मुलांबरोबर जंगलात आले. वाघाटीच्या जाळीत वांझ गाय पिंडीवर दुधाच्या धारा सोडीत असलेले पाहून अवाक झाले. त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसेना. डोळ्यानी पाहिलेला प्रकार त्यांनी गावातील लोकांना सांगितला.

गावातील सर्व लोक वाघाटीच्या जाळीखाली आले. काहीच दिसेना म्हणून जाळीच्या परिसर स्वच्छ केला. परंतु त्यांना काही दिसले किंवा आढळले नाही. त्यांनी खोदकाम करीत असताना त्यांना स्वयंभू श्री गोपालेश्वराचीं पिंड सापडली. पिंडीला पहार लागली. पिंडीतून रक्त वाहू लागले. काम करणारे लोक घाबरले व आपण मोठे पाप कर्म केले असे त्यांना वाटू लागले. रक्त थांबत नाही असे पाहून ज्याची पहार लागली त्याने देवासाठी आपला प्राणाची आत्मआहुती देण्याचे ठरवले व तसा संकल्प लोकांनी सांगितला. तो आपला शिरछेद करणार इतक्यात आवाज कानी पडला, "भक्ता, तू निष्पाप आहेस, नकळत झाले, माझे रक्त थांबवायचे असेल तर वांझ गाय दूध देणारी बातमी ज्या मुलाने सांगितली त्याला बळी द्द्या. तरच माझे रक्त थांबेल. तो मुलगा पुढे आला व मी माझे पाप शंकरास अर्पण करण्य़ास तयार आहे असे म्हाणाला. त्याचे शिर तलवारीने छेदणार इतक्यात प्रत्यक्ष साक्षात भगवान शंभू शिवशंभूंनी त्याचा हात पकडला. शिरछेद करण्यास प्रतिबंध केला. ही घटना घडली तो दिवस म्हणजे कार्तिक शुध्द चतुदर्शी होय, अर्थात वैकुंठ चतुरदर्शी म्हणजेच तुळशी विवाहाच्या दुसर्‍या दिवशी.

देवाने लोकांना माझे वास्तव्य या ठिकांनीच राहील. भक्तीभावाने जे लोक पुजा करतील, अभिषेक करतील आणि बेल वाहतील त्यांना सुखी-समृध्द ठेवीन. हि घटना ज्या गवळ्याच्या गोपाळाने माझा उद्धार केला म्हणून आजपासून मला श्री गोपालेश्वर या नावाने संबोधावे. वाघाटीच्या जाळीखाली झाकून होतो म्हणून या गावास जाखले असे नाव देत आहे.